आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील. तुझ्…

आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला …!!!

तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला …

बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,
त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला …

पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला …

बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला …

सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला …

कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *