यंदाही पाणी पेटले

यंदाही पाणी पेटले
मंत्रालयाला खेटले —

मंत्री म्हणती शोधा राव
तहानला एखादा गाव
ज्याच्या नावाखाली पाणी
पैसे घेऊन वाटले
यंदाही पाणी पेटले —

दुष्काळाचा दया अहवाल
सगळे होऊ मालामाल
सांगा टँकरनेच पाणी
नदीमधे या टाकले
यंदाही पाणी पेटले —–

सरपंचाला घ्या ताब्यात
ठेवा अधिकाऱ्यांच्या जाळ्यात
असे न हो की पाण्याचे श्रेय
कुणी दुसऱ्याने लाटले
यंदाही पाणी पेटले ——

दुष्काळाची ही संधी
होईल सगळ्यांची चांदी
तहानलेले सत्तेसमोर
आजपर्यन्त वाकले
यंदाही पाणी पेटले —–

येऊ दया कितीही मोर्चे
आश्वासन दया वरवरचे
विसरा त्यांना जे यापूर्वी
चळवळीमधे भेटले
यंदाही पाणी पेटले —–

खाते पुन्हा असे नाही
कदाचित् मंत्रीपद नाही
त्यांना दया शाली श्रीफळ जे
दुष्काळातून वाचले
यंदाही पाणी पेटले

             – संतोष हुदलीकर
               नाशिक

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *